शेतकरी संवाद मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद.....वेर्ले विकास संस्था, शिरशिंगे आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

शेतकरी संवाद मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद.....वेर्ले विकास संस्था, शिरशिंगे आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

 

सावंतवाडी
 

      ग्रामीण भागातील तरुण वर्गाने कमी पगाराच्या शहरातील नोकऱ्यांकडे न वळता, त्यांच्याकडील खरी संपत्ती म्हणजे जमीन व शेती याचे मूल्य ओळखून शेती व शेतीपूरक व्यवसायांना अग्रक्रम द्यावा. जिल्ह्याला सध्या दोन लाख लिटर दुधाची आवश्यकता असून, उत्पादन मात्र केवळ एक लाख लिटर आहे. त्यामुळे तरुण शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायासाठी पुढे यावे. यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ आणि प्रशिक्षण देखील बँक उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.वेर्ले विकास संस्था, शिरशिंगे विकास संस्था आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शिरशिंगे व वेर्ले येथे आयोजित 'शेतकरी संवाद मेळाव्यास' शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांच्या संकल्पनेतून हा मेळावा यशस्वीपणे पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.मनीष दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत चांगल्या प्रतीचे बँकिंग पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने गाठलेला ६००० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा आणि विविध स्तरांवर मिळवलेले अव्वल स्थान याचे संपूर्ण श्रेय त्यांनी जिल्ह्यातील मायबाप ग्राहकांना दिले. 'आपला विश्वास आणि आपली साथ' अशीच कायम राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.जैवविविधता आणि निसर्गाचा योग्य वापर करून पर्यटनावर आधारित व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन केले.या मेळाव्यात महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य खाते आणि शेती खाते यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि बँकेच्या माध्यमातून त्यांचे त्वरित निराकरण करणे हा या संवाद मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. जिल्ह्यातील आरोग्य खात्याने आरोग्यासंबंधी समस्या आणि 'आयुष्मान योजने'सारख्या महत्त्वाच्या योजनांवर सविस्तर माहिती दिली. तर, शेती खात्याने उपलब्ध असलेल्या विविध सबसिडी व नवीन योजनांबाबत शेतकऱ्यांना माहिती देऊन त्यांना सजग केले. शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांवर अधिकाऱ्यांनी योग्य ते उपाय सुचवले.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत बँकेच्या विविध डिजिटल सेवा, बचतीचे महत्त्व आणि कर्ज योजनांबाबतची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना एटीएम कार्डचे वितरण देखील यावेळी करण्यात आले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर यांनी आपल्या प्रस्ताविकात बोलताना सर्व शेतकऱ्यांना आश्वस्त केले की, बँक त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि शेतीमधील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल.या मेळाव्याला वेर्ले येथे सैनिक बँकेचे चेअरमन बाबुराव कविटकर, सीईओ सुनील राऊळ, शिरशिंगे गावचे सरपंच दीपक राऊळ, सोसायटीचे चेअरमन दिलीप राणे यांच्यासह अन्य मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.