शिक्षक समिती शाखा वेंगुर्लेचा जागतिक महिला दिन उत्साहात

शिक्षक समिती शाखा वेंगुर्लेचा जागतिक महिला दिन उत्साहात

 

वेंगुर्ले

 

   जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वेंगुर्ला महिला आघाडीच्या वतीने विविध उपक्रमांनी युक्त असा 'मायेची हाक, प्रेमाची साथ' अर्थात 'वसा दातृत्वाचा व वेशभूषा स्पर्धा' हा अभिनव उपक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष प्रसाद जाधव होते. यावेळी तालुका शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र कोनकर, राज्य पदाधिकारी सचिन मदने, जुनी पेन्शन संघटना राज्य पदाधिकारी राजू वजराटकर, कोकण विभाग सचिव संतोष परब, जिल्हा कोषाध्यक्ष कालिदास खानोलकर, जिल्हा कार्य. चिटणीस कर्पूरगौर जाधव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी महिला सशक्तीकरणाचे महत्त्व अधोरेखित करतानाच आजच्या युगात महिलांनी शिक्षण, उद्योग, क्रीडा आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला. महिलांनी स्वावलंबी बनून समाजाच्या विकासात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे 'वसा दातृत्वाचा' या उपक्रमांतर्गत होडावडे येथील आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या कु. रितिका प्रकाश गोसावी या मुलीला संघटनेमार्फत आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच अपंगत्वावर मात करत क्रिकेट क्षेत्रात भरारी घेणाऱ्या  स्मिता गावडे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. शालेय विद्यार्थिनींसाठी आयोजित वेशभूषा स्पर्धेत आध्या खापरे, सान्वी परब आणि श्रुती मराठे यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. इतर यशस्वी स्पर्धकांमध्ये कनिका इंदुलकर, परी सडवेलकर, स्वरा बरकुटे, प्रांजल नार्वेकर, हर्षिता मुळीक आणि गायत्री कावले यांनी यश या स्पर्धेचे परीक्षण श्रीमती खानोलकर, श्रीमती तेरसे, श्रीमती शितोळे, श्रीमती मार्गी, कर्पूरगौर जाधव व श्री. देसाई यांनी केले. याच सोहळ्यात यशस्वी सेवापूर्तीबद्दल विस्तार अधिकारी रामचंद्र कोनकर, मुख्याध्यापिका उर्मिला वेंगुर्लेकर आणि मुख्याध्यापक उदय साळकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता सातपुते यांनी केले तर आभार राशी पोळजी यांनी मानले. या प्रेरणादायी कार्यक्रमाला तालुक्यातील शिक्षक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.