वाघाने महिलेवर केला हल्ला, संतप्त शेतकऱ्यांनी जंगलालाच आग लावली
नागपूर
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एक व्यक्ती मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असताना पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. शेजारच्याच उमरझरी येथील शेत शिवारात मिरची तोडत असलेल्या शेतकरी महिलेवर वाघाने हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात माया सोनवाने या महिला शेतकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. वाघाच्या हल्ल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी थेट जंगलालाच आग लावली. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात जंगलव्याप्त उमरझरी येथे ही घटना घडली. सकाळी दहा वाजता शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, माया रामकृष्ण सोनावणे आणि त्यांचे पती रामकृष्ण सोनावणे हे त्यांच्या शेतात हिरव्या मिरच्या तोडत होते. ते कामात असतानाच शेतालगतच्या जंगलातून आलेल्या वाघाने अचानक माया सोनवाणे यांच्यावर हल्ला केला. तीक्ष्ण दातांनी मानेला पकडून जवळपास दहा फूट फरफटत नेले. हे पाहून पती रामकृष्ण सोनवणे यांनी आरडाओरडा केला. शेजारच्या शेतात काम करणाऱ्या लोकांनी तात्काळ आरडा ओरड करून वाघाला पळवून लावले.उमरझरी येथील वाघाने महिलेवर हल्ला केल्याची माहिती नागरिकांनी वनविभाग आणि पोलीस विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच माहेश्वरी नेवारे, मनोज बोरकर, यशवंत कापगते, सागर कापगते आणि इतर गावकरी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी माया सोनावणे यांना खाजगी चारचाकी वाहनाने साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वनविभाग आणि साकोली पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती देण्यात आली.उमरझरी येथील या घटनेनंतर वनविभागाच्या विरोधात गावकऱ्यांचा असंतोष उफाळून आला. काही स्थानिकांनी जंगल परिसरात जाळपोळ केल्यामुळे साकोली तालुक्यात काही क्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या आगीमुळे जंगलाचे किती नुकसान झाले हे अजून कळू शकले नाही. मात्र, या घटनेने गावकरी चांगलेच संतप्त झाले होते.भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा येथे राहणारे वसंत गणपत मेश्राम हे अंदाजे ५० वर्षाचे गावकरी. मोहफुलाचा मोसम असल्याने सकाळी आठ ते नऊ वाजताच्या सुमारास जंगलात गेले. मात्र, त्याचवेळी या जंगलात असलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी ते मोहफुले वेचत होते. आपल्या आजूबाजूला वाघ असेल याची कल्पनाही त्यांना नव्हती. शेतालगतच हे जंगल असून मोहफुले वेचताना वाघाच्या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते जंगलात एकटे गेले होते की गावकरी सोबत होते, हे कळ शकले नाही.
konkansamwad 
