खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात क्रीडा स्पर्धांचा थरार ! आंतरराज्य बुद्धीबळ आणि जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धांचे आयोजन
कुडाळ
खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कुडाळ भाजपच्या वतीने विविध कार्यक्रमांचे जय्यत नियोजन करण्यात आले आहे. कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायणराव राणे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस १० एप्रिलला साजरा होत असून, त्यानिमित्त कुडाळमध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रमांची मोठी रेलचेल पाहायला मिळणार आहे. या महोत्सवाचा शुभारंभ गुरुवार, ९ एप्रिलला हळदीचे नेरूर येथील श्री देव जटाशंकर मंदिरात लघुरुद्र व महाप्रसादाने होईल, तर १० एप्रिल रोजी नेरूर येथील कलेश्वर मंदिरात अभिषेक करण्यात येईल. क्रीडा क्षेत्रात पालकमंत्री नितेश राणे, माजी आमदार निलेश राणे आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कलच्या मान्यतेने राज्यस्तरीय रॅपिड बुद्धीबळ स्पर्धा आणि जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने 'सुपर सिक्स चॅलेंजर' कॅरम स्पर्धा रंगणार आहे. बुद्धीबळ स्पर्धेत महाराष्ट्र आणि गोवा, बेळगावमधील सुमारे ३०० आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू सहभागी होणार असून, पहिल्या ३० स्पर्धकांना रोख बक्षिसे, चषक व पदके देऊन गौरविण्यात येईल. तसेच ८ ते १७ वयोगटातील मुला-मुलींसाठी विशेष उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. कॅरम स्पर्धेतही १०० हून अधिक खेळाडू आपला कसब दाखवणार असून, या स्पर्धेचे मॉनिटरिंग योगेश फणसळकर करणार आहेत. या दोन्ही स्पर्धा १० एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५:५० या वेळेत कुडाळ येथील श्री महालक्ष्मी हॉलमध्ये संपन्न होतील. बुद्धीबळ स्पर्धेसाठी श्रीकृष्ण आडेलकर आणि कॅरमसाठी योगेश फणसळकर यांच्याकडे नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. हे राणेसाहेबांच्या वाढदिवसाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने भाजपच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत. या क्रीडा महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप कुडाळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
konkansamwad 
