मसाले बनविणे प्रशिक्षणातून १०० महिलांना उपजीविकेची संधी

मसाले बनविणे प्रशिक्षणातून १०० महिलांना उपजीविकेची संधी

 

लांजा 

 

    कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने लांजा तालुक्यातील बेनिखूर्द खेरवसे आणि रुण या दोन गावांमध्ये ग्रामीण महिलांसाठी घरगुती मसाले बनविण्याचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमात १०० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवून लाभ घेतला. प्रशिक्षणामध्ये महिलांना विविध प्रकारचे मसाले तयार करण्याचे सविस्तर मार्गदर्शन व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आले. यामध्ये फिश करी मसाला, चिकन करी मसाला, मटण मसाला, सांबार मसाला, मालवणी मसाला तसेच कोकणातील पारंपरिक २१ प्रकारचे मसाले प्रकार तयार करण्याचे कौशल्य शिकवण्यात आले.बेनी खुर्द खेरवसे येथील प्रशिक्षणाला प्रशासक - सरपंच रूपाली रवींद्र लोटणकर, सदस्या मोनिका प्रकाश चव्हाण, ग्रामसेवक योगेश चंद्रकांत लाखन तर रुण येथील कार्यक्रमाला रुण सरपंच सुहास शंकर साखरकर, उपसरपंच रमेश सदू जाधव, ग्रामसेवक जयवंत पुनाजी भगते, ग्रामपंचायत सदस्या विजया कांबळे व मानसी संदीप पुरोहित तसेच संस्थेचे प्रतिनिधी गौरव पाटकर आणि ट्रेनर प्राची धुरी यांच्यासह ग्राम संघ अध्यक्षा आणि आशा सोविका देखील उपस्थित होत्या. मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन करताना स्वावलंबन आणि कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.या प्रशिक्षणामुळे महिलांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून घरबसल्या मसाले तयार करून आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा मार्ग खुला झाला आहे. महिलांचा आत्मविश्वास वाढणे, स्वावलंबन साधणे आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यात हातभार लावणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.कोकण कला व शिक्षण विकास संस्था ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असून कौशल्य विकास, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि बाजारपेठेशी जोडणी हे संस्थेचे प्रमुख धोरण आहे. ग्रामीण महिलांना सक्षम करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा संस्थेचा प्रयत्न या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला.