अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले....गेल्या १० वर्षांतील सर्वात मोठी कारवाई

अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले....गेल्या १० वर्षांतील सर्वात मोठी कारवाई

मालवण 

 

    कोकणच्या किनारपट्टीला गेल्या ४० वर्षांपासून भेडसावणाऱ्या अनधिकृत मासेमारीच्या समस्येवर मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी कठोर प्रहार केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांतील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली असून यामुळे अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत असे भाजपचे मच्छीमार सेलचे माजी संयोजक रविकिरण तोरसकर यांनी स्पष्ट केले आहे.२०२४ मध्ये नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय मंत्रालयाची धुरा सांभाळल्यापासून अनधिकृत मासेमारीविरुद्धच्या मोहिमेने वेग घेतला आहे. यात सर्वात मोठी कारवाई सन २०२५-२६ या वर्षात तब्बल ८५ नौकांवर अनधिकृत मासेमारीसाठी कारवाई करण्यात आली. या कारवाईतून १ कोटी ४७ लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे, जो गेल्या दशकातील उच्चांक मानला जातो. २०१६ ते २०२६ या दहा वर्षाच्या कालावधीत एकूण ५२५ कारवाया झाल्या, त्यापैकी १३६ कारवाया एकट्या नितेश राणे यांच्या कार्यकाळात झाल्या आहेत.केवळ कारवाई करून न थांबता अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात येत आहे. समुद्रात लक्ष ठेवण्यासाठी 'ड्रोन' तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्यामुळे बेकायदेशीर हालचालींवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. कारवाई दरम्यान बोटींवरील एलईडी लाइट्स आणि इतर प्रतिबंधित साहित्य मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले आहे.परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर, पर्ससीन नेट आणि घातक एलईडी मासेमारीमुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमार संकटात सापडला होता. मात्र, आता राज्य शासन या विषयावर अत्यंत गंभीर असून विविध उपाययोजना अंतिम टप्प्यात आहेत. यात कोकण किनारपट्टीसाठी हाय-स्पीड गस्ती नौका लवकरच सेवेत दाखल होतील. मत्स्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यरत होऊन अनधिकृत मासेमारीवर २४ तास नजर ठेवेल.महाराष्ट्र मासेमारी नियमन कायद्यातील बदल, आधुनिक तंत्रज्ञान आणि मंत्री नितेश राणे यांची प्रबळ राजकीय इच्छाशक्ती यामुळेच आज अनधिकृत मासेमारीवर अंकुश येत आहे. लवकरच कोकणचा समुद्र सुरक्षित होऊन पारंपरिक मच्छीमारांना त्यांचे हक्क मिळतील असे भाजप मच्छीमार सेलचे माजी जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी सांगितले.