अवैध दारू वाहतूक प्रकरणी एक ताब्यात; बांदा पोलिसांची कारवाई
बांदा
बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी राजापूर येथील एकाला ताब्यात घेतले आहे त्याच्याकडून कार सह तब्बल अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज पहाटे करण्यात आली प्रशांत रवींद्र जाधव (वय ३३ वर्षे, रा. बौद्धवाडी, राजापूर, जिल्हा रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे त्याला आज येथील न्यायालयात जाहीर करण्यात येणार आहे याबाबत अधिक माहिती अशी की आज पहाटे ३:३० च्या सुमारास बांदा चेकपोस्टवर वाहनांची तपासणी सुरू असताना, गोव्याहून येणारी एक सिल्व्हर रंगाची टोयोटा इनोव्हा गाडी (क्रमांक MH 43 N 2339) संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी थांबवली. या गाडीची झडती घेतली असता, त्यामध्ये गोवा बनावटीच्या विविध ब्रँड्सच्या दारूचे बॉक्स आढळून आले. यामध्ये मॅकडॉवेल नंबर १, रॉयल चॅलेंज, रॉयल स्टॅग, रॉयल ग्रीन आणि रिझर्व्ह ७ यांसारख्या महागड्या दारूच्या ७५० मिली आणि १८० मिलीच्या एकूण १,२५२ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या दारूची किंमत ४ लाख ८ हजार रुपये असून ७ लाख रुपये किमतीची इनोव्हा गाडी असा एकूण ११ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी प्रशांत जाधव याला ताब्यात घेतले आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदा आणि विनापरवाना दारूची वाहतूक केल्याप्रकरणी त्याच्यावर बांदा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, एएसआय दासू पवार, पोलीस कर्मचारी प्रथमेश पोवार, प्रसाद पाटील, नेल्सन फर्नांडिस आणि प्रशांत बोठे यांच्या पथकाने केली आहे. पोलीस हवालदार परब यांनी या गुन्ह्याची नोंद केली असून पोलीस नाईक नाईक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
konkansamwad 
