सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई....एलईडी लाईट्स वापरून मासेमारी करणारी रत्नागिरीची नौका जप्त

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई....एलईडी लाईट्स वापरून मासेमारी करणारी रत्नागिरीची नौका जप्त

मालवण

 

     देवबाग समोरील सागरी जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील 'भुवनेश्वरी' (IND MH 4 MM 3738) नामक एलईडी लाईट्स वापरून मासेमारी करणाऱ्या नौकेवर धडक कारवाई करण्यात आली असून ही नौका जप्त करण्यात आली आहे.महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत एलईडी लाईट्स वापरून मासेमारी नौकांकडून होणाऱ्या अवैध मासेमारीला चाप लावण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. देवबाग - मालवण समोरील सागरी जलधी क्षेत्रात गस्त घालताना रत्नागिरी जिल्ह्यातील 'भुवनेश्वरी' (IND MH 4 MM 3738) या LED लाइट्स प्रकाशझोत लावून उभ्या असलेल्या मासेमारी नौकेवर धडक कारवाई करण्यात आली.सदर नौकेवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ (सुधारित २०२१) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. परवाना अधिकारी तथा अंमलबजावणी अधिकारी, मालवण यांच्या नेतृत्वाखालील गस्ती पथकाने ही मोहीम राबवली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या दिशा निर्देशानुसार मत्स्यविभाग LED लाइट्स वापरून होणाऱ्या अवैध/अनधिकृत मासेमारीविरोधात कठोर भूमिका घेत आहे. यापूर्वीही अनेक नौका जप्त करून मोठा दंड वसूल करण्यात आला आहे. आणि या पुढेही अशा प्रकारे अवैध/अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्या नौकांवर विभागामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल. असे मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग सहायक आयुक्त सागर कुवेसकर यांनी सांगितले.