देवगड-पुरळ येथे सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात चोरी.......तब्बल आठ लाखांचा मुद्देमाल लंपास

देवगड-पुरळ येथे सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात चोरी.......तब्बल आठ लाखांचा मुद्देमाल लंपास

 

देवगड
 

    देवगड तालुक्यातील पुरळ-कोंडाबा पुजारेवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक सुरेश आत्माराम जाधव यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ८ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना २८ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुरेश जाधव हे त्यांची पत्नी सुनीता यांच्यासह नागपंचमीसाठी मूळ गावी शिवडाव येथे गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला.सुनीता जाधव घरी आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. घरातील कपाट आणि पत्र्याच्या पेटीत ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड आणि ७ लाख ६९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये विविध वजनांची मंगळसूत्रे, सोन्याची चैन, बांगड्या, हार, मोहनमाळ आणि अंगठ्यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच विजयदुर्ग पोलीस स्थानकातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा केला आणि तपास सुरू केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. याप्रकरणी विजयदुर्ग पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.