कृषी दिनानिमित्त दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये ‘ओपन एग्रीकल्चर क्लासरूम’ उपक्रम....शेती शिक्षणाचा अनोखा आदर्श

कृषी दिनानिमित्त दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये ‘ओपन एग्रीकल्चर क्लासरूम’ उपक्रम....शेती शिक्षणाचा अनोखा आदर्श

दाभोली


       राष्ट्रीय कृषी दिनाचे औचित्य साधून दाभोली इंग्लिश स्कूल, दाभोली येथे राष्ट्रीय हरित सेना इको क्लब आणि बहुविध कौशल्य अभ्यासक्रमांतर्गत ‘ओपन एग्रीकल्चर क्लासरूम’ हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला. पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि विविध कौशल्य अभ्यासक्रमाच्या निदेशकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात पालक प्रतिनिधी श्री. राजन कोंडूरकर यांच्या हस्ते ट्रॅक्टर पूजनाने झाली. यावेळी पालक श्री. नरेंद्र तोरस्कर, श्री. पपन मालवणकर, शिक्षिका सौ. रेश्मा चोडणकर, श्री. वसंत पवार सर तसेच बहुविध कौशल्य अभ्यासक्रमातील बागकाम व शेती तंत्रज्ञान विभागाच्या निदेशिका प्रतीक्षा पोईपकर, कार्यशाळा व अभियांत्रिकी तंत्रज्ञान विभागाचे निदेशक श्री. दत्तप्रसाद सांगेलकर, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभागाच्या निदेशिका सौ. पल्लवी चिंदरकर, ऊर्जा आणि पर्यावरण विभागाचे निदेशक श्री. अमोल मसुरकर, श्री. नितीन घोगळे उपस्थित होते.प्रत्यक्ष शेतीकामातून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पालक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे जमिनीची मशागत करून सेंद्रिय खतांचा वापर केला. त्यानंतर सरी-वरंबा व गादीवाफे तयार करून हळद, मिरची, वांगी, दुधी भोपळा, चिबूड भोपळा, वाल, झेंडू तसेच विविध शोभिवंत वनस्पतींची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभागातून शेतीतील मूलभूत तंत्रे, पीक लागवडीच्या पद्धती आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व अनुभवातून जाणून घेतले.श्री साई एजन्सीच्या सहकार्याने कृषी दिनानिमित्त आधुनिक कृषी अवजारांचे विशेष प्रदर्शन भरवण्यात आले. साई श्री एंटरप्रायझेस, वेंगुर्ला येथील श्री. घाटकर सर यांनी विविध कृषी अवजारांची माहिती देत त्यांचे प्रात्यक्षिक सादर केले. आधुनिक शेतीतील यांत्रिकीकरणाचे महत्त्व आणि अवजारांचा योग्य वापर याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. यासाठी श्री. रवींद्र प्रभू, कुडाळ यांचेही सहकार्य लाभले.शाळेचे मुख्याध्यापक श्री. किशोर सोन्सूरकर यांनी मार्गदर्शन करताना शेती शिक्षणाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. भविष्यात शेती हा स्वतंत्र विषय अभ्यासक्रमात समाविष्ट होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीकडे केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर जीवनमूल्ये आणि पर्यावरण संवर्धनाशी जोडलेली जीवनशैली म्हणून पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी शेतात काम करणाऱ्या सर्वांसाठी चुरमुऱ्यांची भेळ तयार करून सर्वांना दिली. यातून श्रमसंस्कार आणि सहकार्याची भावना विद्यार्थ्यांना मिळाली. विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण करणे, सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देणे आणि पालकांचा शालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. उपस्थितांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही असे उपक्रम व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. किशोर सोन्सूरकर सर यांनी सर्वांचे आभार मानले.