छत्तीसगडमध्ये भीषण विमान अपघात
जशपूर
छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील नारायणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरा डोंगराजवळ एका खासगी विमानाचा भीषण अपघात झाला आहे. डोंगराला धडकल्यानंतर विमानाने पेट घेतला असून, या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक खासगी विमान उड्डाण करत असताना जशपूरमधील दुर्गम आणि डोंगराळ भागात असलेल्या आरा डोंगराला धडकले. ही धडक इतकी भीषण होती की, जमिनीवर आदळताच विमानाला मोठी आग लागली. या अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला असून, त्यामध्ये घटनास्थळावरून आकाशात धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा स्पष्टपणे दिसत आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ज्या ठिकाणी विमान कोसळले आहे, तो भाग अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ असल्याने मदत आणि बचाव पथकांना तिथे पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असूनही, प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. या विमानात एकूण किती प्रवासी होते आणि हे विमान कोठून कोठे जात होते, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. प्रशासनाकडून विमानाचा तांत्रिक तपशील आणि प्रवाशांची यादी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघाताची गांभीर्य लक्षात घेऊन सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे. परिस्थिती स्पष्ट झाल्यानंतरच मृतांचा आकडा आणि अपघाताचे नेमके कारण समोर येईल. तोपर्यंत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. सध्या घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
konkansamwad 
