छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयात कृषी दिन उत्साहात साजरा
किर्लोस-ओरोस
महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे शिल्पकार स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथे 1 जुलै रोजी कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालय परिसरात वृक्षारोपणाने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी कृषी दिनाचे महत्त्व, आधुनिक आणि शाश्वत शेतीची गरज तसेच कृषी क्षेत्रातील नवतंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अनुभव जाणून घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सौ. सुप्रिया बालावलकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सिद्धेश भेंडे होते. प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती सदस्य अमित भोगले, दीपक आवळे आणि मनिष पारकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार शिक्षण विभागाचे प्रा. गोपाल गायकी यांनी केले. सूत्रसंचालन सुनील जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. भावना पाताडे यांनी केले.कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, शेतकरी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस यांच्या वतीने करण्यात आले होते.
konkansamwad 
