देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले
नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोल 3 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 3.11 रुपये प्रति लीटर इतके महागले आहे. गेल्या काही दिवसांपासून, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम लवकरच देशांतर्गत ग्राहकांवर होईल, अशी चर्चा सुरू होती. अखेर, तेल कंपन्यांनी आजपासून इंधनाच्या किमतींमध्ये सुधारणा केली. शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून, देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. देशातील निवडणूका संपताच भाव वाढ केल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ-उतार आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. मध्य-पूर्वेकडील संघर्षामुळे इंधनाच्या पुरवठ्यात असलेली कमतरता अद्यापही कायम आहे. ज्याचा थेट परिणाम आता इंधनाच्या किमतींमध्ये दिसून येत आहे. 28 फेब्रुवारी रोजी इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष उफाळून आला असतानाही सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांमध्ये वाढ करणे दीर्घकाळापर्यंत टाळले होते. तेल कंपन्यांना होत असलेल्या तोट्याच्या पार्श्वभूमीवर, सरकारने अखेर इंधनाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान, पेट्रोल-डिझेलचा ग्राहक आता इलेक्ट्रीक कार, सीएनजीकडे वळण्याच्या मानसिकतेत आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सीएनजी स्टेशन कमी असल्याने मोठ मोठ्या रांगा लागत आहेत. त्यातही भाव वाढ होण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे महावितरणचा सतत खंडीत होणारा विद्युत पुरवठा अन् क्वचित ठिकाणी असणारे चार्जिंग स्टेशन यामुळे मोठ आव्हान जिल्ह्यातील सर्वसामान्यांना समोर उभं ठाकले आहे. इंधनाचा काटकसरीने वापर करा, सोन्याची खरेदी करु नका आणि परदेश प्रवास स्थगित करा यांसह काटकसर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होत. यातच आता रुपयाच्या मूल्यात मोठी घसरण झाली असून सध्या अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 96 च्या पातळीच्या खाली घसरले आहे.
konkansamwad 
