देवगड येथे उभ्या कारला दुचाकीची धडक, दोघे गंभीर जखमी
देवगड
नांदगाव मार्गावरील जामसंडे येथील गणेशनगर परिसरातअपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, देवगड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माधव घोगरे यांनी आपली क्रेटा कार बलवान बेकरीसमोर रस्त्याच्या कडेला उभी केली होती आणि ते बेकरीमध्ये गेले होते. त्याच वेळी देवगडहून जामसंडेकडे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराचा आपल्या वाहनावरील ताबा सुटला आणि ही दुचाकी थेट उभ्या कारच्या पाठीमागील भागावर जाऊन जोरात आदळली. ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीवरील चालक आणि पाठीमागे बसलेली व्यक्ती रस्त्यावर फेकली गेली. या अपघातात दोघांच्याही डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच देवगड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती सुप्रिया बंगडे व पोलीस कर्मचारी आशिष कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून अपघाताचा पुढील तपास देवगड पोलीस करीत आहेत.
konkansamwad 
