परुळेत भरधाव डंपरने उडवल्या दोन कार

परुळेत भरधाव डंपरने उडवल्या दोन कार

परुळे

 

       परुळे येथील श्री आदिनारायण मंदिरासमोर रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या डंपरने पार्क केलेल्या दोन कारला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडला. सुदैवाने कारमधील सर्वजण मंदिरात दर्शनासाठी गेलेले असल्याने जीवितहानी टळली. अपघातानंतर डंपर माड-पोफळीच्या बागायतीत जाऊन कोसळला.केळूस येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. मंदार आरोसकर व वेंगुर्ले येथील ओंकार सामंत आपल्या कुटुंबासह आदिनारायणाच्या दर्शनासाठी आले होते. दोन्ही गाड्या रस्त्याच्या कडेला पार्क करून ते मंदिरात गेले होते. त्याचवेळी कुडाळहून येणारा डंपर मंदिराच्या उतारावरून सुसाट वेगाने आला. चालक नशेत असल्याने त्याचा डंपरवर ताबा सुटला व त्याने थेट दोन्ही कारना ठोकर दिली.हॅन्डब्रेक लावून उभी केलेली कार डंपरच्या धडकेनंतर सुमारे 70 फुटांहून अधिक अंतर फरफटत रस्त्यावरून गेली. दोन्ही कारचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. अपघात पाहणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार डंपर चालक नशेत होता. अपघात होताच चालकाने घटनास्थळावरून पळ काढत पोलीस स्टेशनचा आसरा घेतला. डंपर जुन्या बस स्टॉपला धडकून बागायतीत कोसळला. निवती पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहने हटवताना वेंगुर्ले पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई यांनी ठोस भूमिका घेतली. "जोपर्यंत डंपर चालकाची अल्कोहोल चाचणी होत नाही, तोपर्यंत वाहने हटवू नयेत," अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांकडून चाचणीस उशीर होत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. पोलिस व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक झडली. त्यानंतर पोलिस घटनास्थळावरून निघून गेले. रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते."आरोसकर व सामंत कुटुंबावर काळ आला होता, मात्र देवदर्शनामुळे ते सर्वजण बचावले," अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.