देशातील अन्नधान्य उत्पादनात गतवर्षाच्या तुलनेत १८८ लाख टनांची वाढ
मुंबई
देशात आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उच्चांकी अन्नधान्य उत्पादन झाले आहे. प्रामुख्याने गहू, तांदूळ, मका, तेलबिया उत्पादनाचा नवा विक्रम नोंदविला गेला आहे. एकूण अन्नधान्य उत्पादन गतवर्षाच्या तुलनेत १८८ लाख टनांनी वाढून ३,७६५.६५ लाख टनांवर गेले आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली.दिल्लीत दोन दिवसीय खरीप आढावा बैठक सुरू आहे. बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी चौहान बोलत होते. केंद्र सरकारचे धोरण, कृषी वैज्ञानिक आणि संशोधन संस्थांचे योगदान, राज्य सरकारांचे सहकार्य आणि शेतकऱ्यांनी केलेल्या अपार कष्टामुळे आर्थिक वर्ष २०२५ – २६ मध्ये अन्नधान्य उत्पादनांचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. संपलेल्या आर्थिक वर्षांत १८८ लाख टन वाढीसह ३,७६५.६३ लाख टन अन्नधान्य उत्पादन झाले आहे.तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारताने जगात पहिला क्रमांक पटकाविला आहे. तांदूळ उत्पादन १,५०१.८ टनांवरून १,५४०.२४ लाख टनांवर गेले आहे. गहू उत्पादन १,१७९.४ लाख टनांवरून १,२०६.५७ लाख टनांवर गेले आहे. मका उत्पादन ४३४.१ लाख टनांवरून ५५०.९२ लाख टनांवर गेले आहे. तेलबियांचे उत्पादन ४३०.५९ लाख टनांवर गेले आहे, त्यात भुईमुगाचे उत्पादन १३०.७४ लाख टन, मोहरीचे उत्पादन १३७.६८ लाख टन उत्पादन झाले आहे.
konkansamwad 
