अमली पदार्थ, मटका, जुगार रोखण्यात गृह खात अपयशी - परशूराम उपरकर

अमली पदार्थ, मटका, जुगार रोखण्यात गृह खात अपयशी - परशूराम उपरकर

कणकवली

 

    सिंधुदुर्गात अमली पदार्थामुळे युवा पिढी बरबाद होत असून अनेक तरूण आत्महत्या करत आहेत. तर पोलिसांच्या आशीर्वादाने मटका आणि जुगार खुलेआम सुरू आहेत. मध्यंतरी पालकमंत्र्यांनी सिंघम स्टाईलने मटका अड्डयावर धाड टाकली. परंतु ही कारवाई खरंच अवैध धंदे रोखण्यासाठी होती की हप्ता वाढवून घेण्यासाठी असा आता प्रश्न पडला आहे. येत्या काही दिवसांत पोलीस यंत्रणेकडून यावर कारवाई न झाल्यास शिवसेना अवैध धंद्यावर धाड टाकणार असा इशारा शिवसेना नेते, माजी आमदार परशूराम उपरकर यांनी आज दिला.येथील आपल्या संपर्क कार्यालयात उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, पोलीस यंत्रणेकडून अमली पदार्थ आणि मटक्यावर आठवड्यातून एक दोन दिवस धाड टाकल्याचे दाखवले जाते. प्रत्यक्षात मात्र अमली पदार्थाचे नेटवर्क वेगाने विस्तारत आहेत. अमली पदार्थामध्ये अडकलेले तरूणांना अखेर आत्महत्येची वेळ येत आहे. वर्षाला सरसरी अशा दीडशे आत्महत्या जिल्ह्यात होत आहेत.  उपरकर म्हणाले, सिंधुदुर्गात पट आणि जुगार देखील खुलेआम सुरू झाले आहेत. पोलीस मुख्यालयापासून अवघ्या चार किलोमिटर अंतरावर ओरोस खुर्द येथे मोठा जुगार अड्डा चालतो. त्यासाठी दीड लाखापर्यंत हप्ता दिला जात असल्याची चर्चा आहे. याखेरीज सिंधुदुर्गात माजगाव, कोलगाव, नरेंद्र डोंगर, इन्सूली, निवती, वेंगुर्ले, कलमठ, मसुरे, वराड, कट्टा या ठिकाणी देखील खुलेआम जुगार सुरू आहे. हे जुगार अड्डे सुरू राहावेत यासाठी काही सोशल मिडिया चॅनेलला देखील मॅनेज केले जात आहे. सिंधुदुर्गात सुरू असलेलया या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस यंत्रणा डोळेझाक करत आहे. पालकमंत्री आणि राज्याचे गृह मंत्री देखील मटका, जुगार रोखण्यात अपयशी ठरले आहेत. येत्या काही दिवसांत पोलिसांनी पूर्णतः अवैध धंदे बंद न केल्यास शिवसेनाच अशा अवैध धंद्यांवर धाड मारून ते बंद करणार असल्याचा इशारा  उपरकर यांनी दिला.