बांदा परिसरातील कास येथे ११ केव्हीचा पोल कोसळला.
बांदा
बांदा परिसरातील कास येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे ११ केव्ही वीजवाहिनीचा एक विद्युत पोल कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. सुदैवाने ही घटना रात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली असली, तरी या घटनेनंतर कास ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण पंडित यांनी महावितरणच्या बांदा विभागाचे कनिष्ठ अभियंता ठाकूर यांच्यावर तीव्र शब्दांत निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. मुसळधार पावसात झाडांचा मोठा ताण वीजवाहिनीवर आल्याने ११ केव्हीचा विद्युत पोल कोसळला. हा पोल रस्त्यावर पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागली होती. घटनास्थळाच्या अगदी बाजूलाच शाळा असून तिथून विद्यार्थ्यांची सतत ये-जा असते. जर ही घटना दिवसाढवळ्या घडली असती आणि एखादी मोठी दुर्घटना झाली असती, तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल सरपंच प्रवीण पंडित यांनी उपस्थित केला आहे. महावितरणकडून करण्यात आलेली सर्व कामे निकृष्ट दर्जाची असून, अधिकारी वारंवार सांगूनही या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप त्यांनी केला. सरपंचांनी पुढे सांगितले की, वीजवाहिनीवर झाडांच्या फांद्या आल्या असून पावसाळ्यात मोठा अपघात होऊ शकतो, अशी तोंडी सूचना चार दिवसांपूर्वीच महावितरणला देण्यात आली होती. विशेषतः कनिष्ठ अभियंता ठाकूर यांना याबाबत वेळोवेळी कल्पना देण्यात आली होती, मात्र त्यानंतरही झाडांची आवश्यक छाटणी करण्यात आली नाही. यापूर्वी मे महिन्यात स्वतः सरपंच, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ आणि महावितरणचे कार्यकारी अभियंता वनमोरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना देऊनही स्थानिक पातळीवर आवश्यक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार का, असा सवाल त्यांनी केला आहे. दर मंगळवारी विद्युत पुरवठा खंडित करूनही कामात सुधारणा होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांलगतची धोकादायक झाडे व फांद्यांची छाटणी करण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. यापुढे जर असे प्रकार घडत राहिले आणि कोणतीही जीवितहानी झाली, तर त्याला महावितरणचे कनिष्ठ अभियंताच सर्वस्वी जबाबदार राहतील, असा जाहीर इशारा सरपंच प्रवीण पंडित यांनी दिला आहे.
konkansamwad 
