शिष्यवृत्ती परीक्षेत आंबोली सैनिक स्कूलचे यश

शिष्यवृत्ती परीक्षेत आंबोली सैनिक स्कूलचे यश

आंबोली

 

     आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील कॅडेट भूषण पवार आणि कॅडेट गौरांग पेडणेकर यांनी शिष्यवृत्ती मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या दोन्ही कॅडेट्सनी मिळवलेल्या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाची दखल घेत विस्तार अधिकारी सौ. भावना गावडे यांनी शाळेला भेट दिली आणि दोन्ही यशवंत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशामुळे संस्थेच्या स्तरावरूनही आनंदाचे वातावरण आहे. संस्थेचे अध्यक्ष सुनील राऊळ, सचिव जॉय डान्टस, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ आणि प्राचार्य नितीन गावडे यांनी यशस्वी कॅडेट्सचे तसेच त्यांना मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना परीक्षाभिमुख मार्गदर्शन करण्यात शिक्षक अरुण गावडे, परमेश्वर सावळे, मनोज देसाई आणि दत्ता वावधने यांनी विशेष परिश्रम घेतले, त्यामुळेच या यशाला गवसणी घालता आली असल्याचे कौतुकादरम्यान सांगण्यात आले.