दोडामार्ग पोलिसांची धडक कारवाई.....साटेली-भेडशीतील घरफोडीचा गुन्हा उघड, १४ तोळे सोने जप्त
दोडामार्ग
साटेली-भेडशी वरचीवाडी येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीचा गुन्हा दोडामार्ग पोलिसांनी उघडकीस आणला आहे. सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या श्वान 'सनी' आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी 19 वर्षीय आरोपीला अटक करून त्याच्याकडून सुमारे 14 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.मौजे साटेली-भेडशी वरचीवाडी येथील रहिवासी आशेशाव सालू रॉड्रीक्स यांचे भाऊ रोमाल शिलोरीयान फर्नांडीस यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी घरातून 3 लाख 7 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331(4), 305(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत करत होते.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला गती दिली. गोपनीय बातमीदार आणि सिंधुदुर्ग पोलीस दलाचा गुन्हे अन्वेषण श्वान 'सनी' याच्या मदतीने पोलिसांनी हर्ष सूर्यकांत नाईक वय 19 वर्षे, रा. साटेली-भेडशी, ता. दोडामार्ग याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून चोरीला गेलेले सुमारे 14 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. ही यशस्वी कामगिरी सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, दोडामार्गचे पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, स.पो.नि. मागाडे, पो.उ.नि. आशिष भगत, पोलीस हवालदार वसंत देसाई, विठोबा सावंत, विक्रम गवस, बाळकृष्ण गवस, अंकुश नाईक तसेच पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव, परशुराम सावंत आणि गावडे यांनी केली.अवघ्या काही दिवसांतच घरफोडीचा छडा लावून मुद्देमाल जप्त केल्याने दोडामार्ग पोलिसांचे तालुक्यात कौतुक होत आहे.
konkansamwad 
