कळसुलकर प्राथमिक शाळेचा प्रज्ञाशोध परीक्षेत धडाका; १३ विद्यार्थ्यांना पदके

कळसुलकर प्राथमिक शाळेचा प्रज्ञाशोध परीक्षेत धडाका; १३ विद्यार्थ्यांना पदके

सावंतवाडी

 

    सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'यशवंत प्रज्ञाशोध परीक्षेत' शाळेच्या १३ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विविध पदकांवर आपली मोहोर उमटवली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सावंतवाडी तालुका मर्यादित स्तरावर ही स्पर्धा घेतली जात असून, यावर्षी कळसुलकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत वर्चस्व गाजवले आहे. या परीक्षेत चैतन्य सावंत, कृष्णा पायशेट, धारा कोरगावकर, सार्थक नाईक आणि अवनी आवटे या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला. तसेच संकेत परब व आरोही पवार यांनी रौप्य पदक, तर सार्थक वरक, गार्गी पई, श्रीकांत घुगे, चैत्राली काळे, शौर्य अपराध आणि श्रीकांत गवळी या विद्यार्थ्यांनी कांस्यपदक मिळवून विशेष यश संपादन केले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षक श्री. डी. जी. वरक आणि स्मिता घाडीगावकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई, सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, शाळेचे सर्व संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि हितचिंतक यांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष गौरव सोहळा येत्या ३० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला असून, त्यामध्ये त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. शाळेच्या या यशाबद्दल संपूर्ण तालुक्यातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.