असनिये-कनेवाडी येथे रस्त्यालगतची दरड कोसळली....जेसीबीमुळे पाया कमकुवत झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप
सावंतवाडी
सावंतवाडी जवळील असनिये-कनेवाडी येथे रस्त्यालगतची एक मोठी दरड अचानक कोसळून मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने दरड कोसळली तेव्हा परिसरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे.स्थानिक ग्रामस्थांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सदर ठिकाणी सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ता रुंदीकरण आणि गटाराच्या कामासाठी काही दिवसांपूर्वी जेसीबीच्या साहाय्याने ही दरड मोठ्या प्रमाणात पोखरण्यात आली होती. त्यामुळे दरडीचा पाया कमकुवत झाला आणि ती कोसळली, असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरड कोसळल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच असनिये-कनेवाडीतील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी एकत्र येऊन रस्त्यावर पडलेली झाडे, मोठे दगड आणि माती बाजूला सारून वाहतूक पुन्हा सुरळीत केली.घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून, रस्त्याच्या कामादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
konkansamwad 
