माऊली मंदिरात रंगला पैठणीचा खेळ; शेर्लेतील होम मिनिस्टर स्पर्धेत सुप्रिया वारंग अव्वल!

माऊली मंदिरात रंगला पैठणीचा खेळ; शेर्लेतील होम मिनिस्टर स्पर्धेत सुप्रिया वारंग अव्वल!

बांदा

   शेर्ले येथील श्री देवी माऊली मंदिराच्या प्रांगणात नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून तसेच सान्वी धुरी हिच्या वाढदिवसानिमित्त धुरी कुटुंबीयांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा' या विशेष कार्यक्रमात सुप्रिया वारंग यांनी उत्कृष्ट कामगिरी करत मानाच्या पैठणीचा मान पटकावला. या चुरशीच्या स्पर्धेत अर्चना धुरी यांनी द्वितीय, तर अस्मिता आरोस्कर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. सलग तीन तासांहून अधिक काळ रंगलेल्या या सोहळ्याला शेर्ले परिसरातील महिलांचा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध मनोरंजक खेळ, प्रश्नमंजुषा, कौशल्याधारित स्पर्धा आणि धमाल उपक्रमांमुळे माऊली मंदिर परिसरात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक फेरीत महिलांनी आपले कौशल्य, हजरजबाबीपणा आणि समयसूचकता दाखवत उपस्थितांची मने जिंकली. खेळादरम्यान झालेले हास्य-विनोद, टाळ्यांचा कडकडाट आणि प्रेक्षकांची दाद यामुळे कार्यक्रमाची रंगत द्विगुणीत झाली. नवरात्रोत्सवाच्या आनंदात महिलांना एकत्र आणत मनोरंजन आणि स्नेहभावाचा अनोखा अनुभव देणाऱ्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त जे. डी. पाटील आणि स्वाती पाटील यांनी आपल्या मिश्कील व प्रभावी शैलीत केले. स्पर्धा संपल्यानंतर सर्व विजेत्यांचा उपस्थितांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. महिलांच्या अभूतपूर्व सहभागामुळे हा कार्यक्रम शेर्लेतील नवरात्रोत्सवातील एक अत्यंत आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण ठरला.