सिंधुदुर्गात २२ नोव्हेंबरला भव्य कायदेविषयक सेवा महाशिबिर
सिंधुदुर्ग
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने रविवार दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी कसाल येथे भव्य कायदेविषयक सेवा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कसाल ता. कुडाळ येथे हे शिबिर होणार असून नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ, मोफत कायदेविषयक सल्ला आणि आरोग्य तपासणीची सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहे.मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्गचे पालक न्यायमूर्ती श्याम चांडक आणि न्यायमूर्ती फरहान दुबाश यांच्या मार्गदर्शनाखाली या महाशिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा वकील संघ तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होणार आहे.महाशिबिराच्या नियोजनासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली दि. २१ ऑक्टोबर रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी, सचिव आर. व्ही. नडगदल्ली यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.या महाशिबिरात समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पोहोचवून थेट लाभ देणे हा प्रमुख उद्देश आहे. यासाठी विविध विभागांचे स्वतंत्र स्टॉल उभारून योजनांची माहिती, अर्ज भरून घेणे आणि कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत कायदेविषयक सल्ला, हक्क आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य तपासणी तसेच आयुष्मान कार्ड, आभा कार्ड आणि आधार कार्ड अद्ययावत करण्याची सुविधाही उपलब्ध असणार आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी, विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू नागरिकांनी या महाशिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी केले आहे.
संपर्क:सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण - ०२३६२-२२८४१४ / ८५९१९०३६०७, ई-मेल dlsa-sindhu@bhc.gov.in, हेल्पलाईन १५१००
konkansamwad 
