आजगाव वाघबीळ येथे कदंबा बसचा मोठा अपघात टळला......सुमारे ४० प्रवाशांचे थरारक बचाव
आजगाव
पणजी–शिरोडा मार्गे वेंगुर्ला धावणाऱ्या कदंबा महामंडळाच्या बसचा आज सायंकाळी आजगाव येथील वाघबीळ परिसरात अपघात झाला. सुदैवाने बस दरीच्या कडेला जाऊन थांबल्याने सुमारे 40 प्रवाशांचे प्राण वाचले. बस आणखी काही मीटर पुढे गेली असती तर ती तब्बल 25 ते 30 फूट खोल दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली असती.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी 4.20 वाजता पणजीहून वेंगुर्ल्याकडे निघालेली ही कदंबा बस गोव्यात काम करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत सोयीची असल्याने नेहमीप्रमाणे आजही बसमध्ये 30 हून अधिक प्रवासी होते.बस आजगाव येथील वाघबीळ परिसरातील धोकादायक वळणावर आली असता, आजगाव–मळेवाड मार्गावर जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाने अचानक ब्रेक लावला. त्यामागील दुचाकीस्वार बससमोर आल्याने त्याला वाचवण्यासाठी कदंबा बस चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने ब्रेक मारून बस बाजूला घेतली. मात्र रस्त्याच्या साईडपट्टीचा अंदाज न आल्याने बस रस्त्यालगतच्या सुमारे सात ते आठ फूट खोल भागात कलंडली.या अपघातात बस दरीच्या कडेला जाऊन थांबली. आणखी चार ते पाच मीटर पुढे गेली असती तर बस 25 ते 30 फूट खोल दरीत कोसळून मोठी जीवितहानी झाली असती. त्यामुळे प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याची भावना घटनास्थळी व्यक्त करण्यात आली.अपघातानंतर स्थानिक तरुणांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. अण्णा मालजी, संकेत पायनाईक, दीपक भाईडकर, सुमित पांढरे, राजन परब आणि नाना गोवकर यांनी कटवणीच्या सहाय्याने बसचा इमर्जन्सी एक्झिट दरवाजा उघडून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी वाघबीळ येथील धोकादायक वळणावर तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
konkansamwad 
