जमीन दलालीच्या आरोपांवर संजू परब यांनी पुरावे द्यावेत - मनसेची मागणी
सावंतवाडी
विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारावर जमिनींचा दलाल असल्याचा व शेतकऱ्यांना फसवून जमिनी कवडीमोलाने घेऊन परप्रांतीयांना कोट्यवधींना विकल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत केला होता. आपल्याकडे पुरावे असून योग्य वेळी उघड करू, असेही ते म्हणाले होते.मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाने नेमलेली चौकशी समिती जमीन व्यवहारांची चौकशी करण्यासाठी आली असताना हे पुरावे समितीला का दिले नाहीत, असा सवाल मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी उपस्थित केला आहे."पुरावे दिले असते तर परप्रांतीयांच्या घशात जमिनी कोण घालत आहे, हे जनतेसमोर आले असते. अनेक राजकीय पुढारी गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी गोलमाल करून विकून कोट्यवधी कमावत असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. निवडणुकीपुरती वातावरण निर्मिती न करता संजू परब यांनी आता तरी त्या कथित लोकांची नावे जाहीर करावीत," असे आवाहन केसरकर यांनी केले आहे.
konkansamwad 
