शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी सिंधुदुर्गातील आणखी ५८१ शेतकरी पात्र
सिंधुदुर्ग
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठीची नवीन यादी दि. २२ ऑक्टोबर रोजी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी ५८१ शेतकऱ्यांचा समावेश असून आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ५ हजार ४०५ शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी दिली.नवीन यादीतील ५८१ शेतकऱ्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांशी संबंधित ४८३ शेतकरी तर राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांशी संबंधित ९८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी शासनाच्या https://firs.maharashtra.gov.in या पोर्टलवर उपलब्ध आहे. तसेच संबंधित विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, तालुका सहायक निबंधक कार्यालये, ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयांमध्येही याद्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत.कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी यादीत नाव असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी आधार कार्ड, ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, कर्ज खात्याचे पासबुक आणि बचत खात्याचे पासबुक ही कागदपत्रे सोबत नेणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून यासाठी कोणतेही शुल्क देऊ नये, असे आवाहनही जिल्हा उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी केले आहे.
konkansamwad 
