शारदीय नवरात्र - २०२६....नववा दिवस : सिद्धिदात्री - नवमी आजचा रंग : मोरपंखी हिरवा
शारदीय नवरात्राचा आज नववा आणि अंतिम दिवस आहे, ज्याला महानवमी किंवा सिद्धिदात्री नवमी असे म्हटले जाते. नवरात्राच्या नऊ दिवसांच्या प्रदीर्घ, कठोर आणि अत्यंत पवित्र अशा आध्यात्मिक प्रवासाचा हा कळस आहे, हा शेवट नाही तर सिद्धीचा प्रारंभ आहे. आज १९ ऑक्टोबर २०२६, सोमवार रोजी नवरात्राच्या या अंतिम दिवशी नऊ दुर्गांपैकी नवव्या आणि सर्व सिद्धी प्रदान करणाऱ्या माता सिद्धिदात्रीची पूजा केली जात आहे. आजचा रंग आहे मोरपंखी हिरवा, म्हणजेच पीकॉक ग्रीन. हा रंग केवळ सौंदर्याचा प्रतीक नाही, तर तो मयूराच्या पिसाऱ्यासारखा, ज्यात अनेक रंग सामावलेले असतात, तसा सर्वसमावेशकतेचा, करुणा, शांती, समृद्धी आणि नव्या सुरुवातीचा प्रतीक आहे. मोर हा श्रीकृष्णाला प्रिय आहे, सरस्वतीचे वाहन आहे आणि त्याचा पिसारा हा आकाशातील इंद्रधनुष्यासारखा वैभवसंपन्न असतो, म्हणूनच मोरपंखी रंग हा जीवनातील सर्व रंग, सर्व अनुभव, सर्व सिद्धी आपल्यात सामावून घेण्याचा संदेश देतो आणि आजच्या दिवशी हा रंग परिधान केल्याने देवी प्रसन्न होऊन ज्ञान, वैभव आणि सिद्धी प्राप्त होते अशी दृढ श्रद्धा आहे. माता सिद्धिदात्री कोण आहे, तिचे स्वरूप काय आहे, हे समजून घेतले तरच नवरात्राचा खरा अर्थ समजतो. मार्कंडेय पुराण आणि देवी भागवतनुसार, सिद्धिदात्री ही सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देवी आहे. सिद्धी म्हणजे केवळ चमत्कार नव्हे, तर मानवी जीवनाला परिपूर्ण करणारी अष्टसिद्धी - अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी तिच्या कृपेनेच प्राप्त होतात. देवीचे स्वरूप अत्यंत तेजस्वी आणि मनोहारी आहे, ती कमळावर विराजमान आहे, तिला चार भुजा आहेत, एका हातात गदा, दुसऱ्या हातात सुदर्शन चक्र, तिसऱ्या हातात शंख आणि चौथ्या हातात कमळपुष्प आहे, तिचे वाहन सिंह आहे आणि तिच्या मुखमंडलावर एक अलौकिक तेज आणि ममत्वाचे हास्य आहे. असे म्हटले जाते की, स्वतः भगवान शंकरांनी सिद्धी प्राप्त करण्यासाठी सिद्धिदात्रीची कठोर आराधना केली होती आणि तिच्याच कृपेने त्यांना अर्धनारीश्वर रूप प्राप्त झाले, त्यांच्या शरीराचा अर्धा भाग देवीचा झाला. याच अर्थ असा की, शिवाशिवाय शक्ती अपुरी आहे आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे, आणि या दोघांचे मिलन म्हणजेच सिद्धिदात्री आहे. ती केवळ राक्षसांचा संहार करणारी दुर्गा नाही, तर ती भक्ताला ब्रह्मांडाचे ज्ञान देणारी, अज्ञानाचा अंधकार दूर करणारी जगदंबा आहे. जर नवरात्राच्या नऊ दिवसांना एका मानवी जीवनाचा किंवा एका साधकाच्या अंतर्यात्रेचा आराखडा मानला तर नवव्या दिवसाचे महत्त्व हे सर्वात गहन आणि वैचारिक आहे. पहिल्या आठ दिवसांत आपण आपल्यातील शैलपुत्रीची स्थिरता, ब्रह्मचारिणीचा संयम, चंद्रघंटाचा नाद, कुष्मांडाची सृजनशक्ती, स्कंदमातेचे वात्सल्य, कात्यायनीचे शौर्य, कालरात्रीचे भय-विनाश आणि महागौरीची शुद्धता प्राप्त केली. पण या सर्व गुणांचे करायचे काय? या सर्व शक्ती मिळवून जर त्यांना योग्य दिशा नाही मिळाली, तर त्या शक्ती अहंकारात बदलू शकतात. म्हणूनच नवव्या दिवशी सिद्धिदात्री येते. ती शिकवते की, शक्तीचा उपयोग सिद्धीसाठी करा, सिद्धीचा उपयोग लोककल्याणासाठी करा. सिद्धी म्हणजे मार्केटमधील जादू नाही, तर सिद्धी म्हणजे आपल्या जीवनातील प्रत्येक कार्यात परिपूर्णता आणणे. एखाद्या आईने मुलाला प्रेमाने वाढवणे ही सिद्धी आहे, एखाद्या शेतकऱ्याने शेतात पीक घेणे ही सिद्धी आहे, एखाद्या लेखकाने एका वाक्याने वाचकाचे मन जिंकणे ही सिद्धी आहे. सिद्धिदात्री आपल्याला सांगते की, तू आता तयार आहेस, तू शुद्ध झाला आहेस, आता तुझ्यातील शिव आणि शक्ती एक झाले आहेत, आता तू जगात जा आणि तुझ्या ज्ञानाने, तुझ्या कर्माने सिद्धी प्राप्त कर. म्हणूनच नवरात्राचा शेवट हा विजयादशमीने होतो, कारण सिद्धी मिळाल्याशिवाय विजय नाही. आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व हेही आहे की, आज अनेक ठिकाणी महानवमीच्या हवनाने, कन्या पूजनाने आणि सरस्वती पूजनाने नवरात्राची सांगता केली जाते. आजचा नैवेद्य म्हणून तीळ आणि तीळापासून बनवलेले पदार्थ देवीला अर्पण केले जातात, कारण तीळ हे सात्विकता, अमरत्व आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. आजच्या दिवशी भक्तांनी मोरपंखी रंग परिधान करून माता सिद्धिदात्रीची पूजा करताना एकच प्रार्थना करावी की, हे माते, मला चमत्कार नको, मला प्रसिद्धी नको, मला केवळ माझ्या कर्मात सिद्धी दे, माझ्या विचारात शुद्धता दे आणि माझ्या जीवनाला परिपूर्णता दे. कारण जेव्हा सिद्धिदात्री प्रसन्न होते, तेव्हा मनुष्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही, त्याला सर्व ज्ञान, सर्व वैभव आपोआप प्राप्त होते. आजचा मंत्र आहे - सिद्धगन्धर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि। सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी॥ या मंत्राच्या पठणाने आणि मोरपंखी रंगाच्या शांत, समृद्ध ऊर्जेने आपले जीवनही सिद्धीमय होईल, अशीच प्रार्थना. तुम्हा सर्वांना सिद्धिदात्री नवमीच्या आणि शारदीय नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा.
konkansamwad 
