दोडामार्ग-बांदा मार्गावर एसटी बसची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

दोडामार्ग-बांदा मार्गावर एसटी बसची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

दोडामार्ग

 

    दोडामार्ग ते बांदा मार्गावर सासोली हेदूसवाडी येथील इब्रामपूर तिठ्यावर पणजी-धाराशिव एसटी बस आणि मोटारसायकल दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार दिलीप हळणकर (५५, रा. कुडासे वानोशी) यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाने ब्रेक लावला असता, बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात शिरली. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस पणजीहून धाराशिवकडे जात असताना हेदूसवाडी इब्रामपूर तिठ्यावर दिलीप हळणकर आपली मोटारसायकल घेऊन मुख्य रस्त्यावर आले. यावेळी बस चालक राहुल अंकित (रा. कोल्हापूर) यांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि ब्रेक लावला. मात्र, बसची दुचाकीला धडक बसली आणि ती काही अंतर फरफटत जाऊन दीपक गवस यांच्या दुकानाला धडकली. या भीषण अपघातात हळणकर यांना आपले प्राण गमवावे लागले.अपघाताची बातमी समजताच कुडासे वानोशी येथील ग्रामस्थ घटनास्थळी मोठ्या संख्येने जमा झाले. यावेळी संतप्त नागरिकांनी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला, तसेच बस चालकाच्या अंगावरही धावून गेले. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत बसमधील सुमारे १४ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. हे प्रवासी कोल्हापूर, पंढरपूर आणि धाराशिव भागातील होते.मृत दिलीप हळणकर यांच्या पश्चात त्यांची मनोरुग्ण पत्नी आहे. त्यांना अपत्य नसल्याने हळणकर हेच पत्नीची देखभाल करत होते. आता त्यांच्या जाण्याने या हळणकर यांचा आधार हरपला असून त्यांची सेवा कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या अपघातामुळे दोडामार्ग-बांदा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सावंतवाडी आगाराचे अधिकारी आणि दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून प्रवाशांना दुसऱ्या बसने रवाना करण्याची व्यवस्था केली.