पालक सचिव विरेंद्र सिंह यांची वेंगुर्ला तालुक्यात विविध ठिकाणी पाहणी.....लोकसहभागातून झालेल्या जलसंधारण कामांचे कौतुक
सिंधुदुर्ग
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांना वेळेत सेवा वितरण आणि लोकसहभागातून होणारी विकासकामे यांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक सचिव तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव विरेंद्र सिंह (भाप्रसे) यांनी वेंगुर्ला तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान दिल्या. पालक सचिवांनी वेंगुर्ला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, जलसंधारण काम आणि नगरपरिषदेच्या विविध सुविधांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.पालक सचिवांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तुळस येथे भेट देऊन बाह्यरुग्ण विभाग, शीतसाखळी कक्ष, औषध भांडार, प्रसूतीगृह आणि असंसर्गजन्य रोग नियंत्रण कक्षाची पाहणी केली. यावेळी विविध नोंदवही तपासून कामकाजाची माहिती घेतली. लाभार्थ्यांना वयोवंदना कार्ड आणि आभा कार्डचे वितरणही यावेळी करण्यात आले. त्यानंतर त्यांनी मातोंड ग्रामपंचायतीला भेट दिली. येथे लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात वनराई बंधारे आणि अन्य जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. ग्रामस्थांनी “तुम्ही आलात आणि पाऊस पडला” अशा शब्दांत आनंद व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्या वतीने विविध दाखल्यांचे वितरण पालक सचिवांच्या हस्ते करण्यात आले आणि सीएससी केंद्राला भेट देऊन ऑनलाइन सेवांची माहिती घेतली. मातोंड नंतर त्यांनी सावंतवाडा येथील बंधाऱ्याची पाहणी केली.वेंगुर्ला नगरपरिषदेच्या अंतर्गत उभारण्यात आलेल्या नमो उद्यानाची पाहणी करून त्यांनी या कामाचे कौतुक केले. उद्यानाची उभारणी अत्यंत आदर्शवत पद्धतीने करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर नगरपरिषद कार्यालयाला भेट देऊन नागरी सेवांच्या वितरण प्रक्रियेची माहिती घेतली. नगराध्यक्ष दिलीप गिरप, सदस्य प्रशांत आपटे आणि मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी कामकाजाची माहिती दिली. सुमारे १५० वर्षांची परंपरा असलेल्या वेंगुर्ला नगरपालिकेने आता प्रगतिशील कामे हाती घेऊन प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यावर भर द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
konkansamwad 
