वेंगुर्लेत ३० लाखांचे बेकायदा कीटकनाशक जप्त.....श्रीराम कृषी केंद्रावर कृषी विभागाची धडक कारवाई

वेंगुर्लेत ३० लाखांचे बेकायदा कीटकनाशक जप्त.....श्रीराम कृषी केंद्रावर कृषी विभागाची धडक कारवाई

वेंगुर्ला 


      वेंगुर्ला शहरातील तुळस रोड परिसरात विनापरवाना कीटकनाशकांची साठवणूक आणि विक्री केल्याप्रकरणी श्रीराम कृषी केंद्राशी संबंधित रामराजा सुरेश लामकाणे यांच्याविरोधात वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने २० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नायरा पेट्रोल पंपाजवळ ही कारवाई केली. या कारवाईत २६ प्रकारची कीटकनाशके, एकूण १,६१४.७५ किलो/लिटर साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत तब्बल ३० लाख ९३ हजार ४१५ रुपये आहे.कृषी अधिकारी प्रकाश मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भरारी पथक प्रमुख राहुल माने, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुशांत भोसले आणि कृषी सेवक पंकज पाटील यांच्या पथकाने तपासणी केली असता, तुळस रोडवरील एका मांगरामध्ये हा साठा विनापरवाना ठेवलेला आढळला. या ठिकाणी साठवणूक परवाना, साठा रजिस्टर, खरेदी-विक्री बिले आणि दरफलक काहीच नव्हते.बेकायदेशीर खत व कृषी निविष्ठा विक्रीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास वेंगुर्ला पोलीस करीत आहेत.