खारेपाटणच्या विकासाला नवी दिशा आणि महिला सक्षमीकरणाचा दीप....आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत दीपावली महोत्सवाचा शुभारंभ

खारेपाटणच्या विकासाला नवी दिशा आणि महिला सक्षमीकरणाचा दीप....आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत दीपावली महोत्सवाचा शुभारंभ

कणकवली

    ग्रामीण भागातील होतकरू महिला बचतगटांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने खारेपाटण येथे आयोजित ‘भव्य बचतगट दीपावली महोत्सव २०२६’ चे दिमाखदार उद्घाटन रविवारी सायंकाळी ६ वाजता आमदार निलेश राणे यांच्या हस्ते फीत कापून पार पडले. खारेपाटण एस.टी. बसस्थानकासमोरील पटांगणात १ ते ८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत भरविण्यात आलेल्या या दीपावली बाजारात महिला बचतगटांचे तब्बल २० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये दिवाळीचा खमंग फराळ, आकर्षक आकाशकंदील, शोभेच्या वस्तू, दिवे, पणत्या, रांगोळी आणि घरगुती वापरातील विविध दर्जेदार उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने खरेदीसाठी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या उद्घाटन सोहळ्यास शिवसेना नेते संजय आंग्रे, जिल्हा परिषद सभापती रुहिता तांबे, जिल्हाप्रमुख अशपाक हाजू, तालुकाप्रमुख मंगेश गुरव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांशी संवाद साधताना आमदार निलेश राणे यांनी महिला बचतगटांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. तसेच, खारेपाटणमधील मुख्य रस्त्याचा प्रश्न सोडवण्याबरोबरच, गावात पाणीटंचाई रोखण्यासाठी बंधाऱ्याचे बांधकाम आणि खारे-गोडे पाणी वेगळे करण्याच्या नियोजनासाठी आवश्यक तो सर्व निधी लवकरात लवकर उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या धोरणाला हातभार लावत महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने आयोजित या महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला आमदार राणे यांनी भेट देऊन महिला बचतगटांच्या सदस्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुकाप्रमुख मंगेश गुरव यांनी केले.