मालवण तालुक्यातील कट्टा येथे आठ बंद बंगले फोडले
मालवण ता. २६
कट्टा येथील काराणेवाडी निसर्ग निवास या बंगलो प्रोजेक्टमध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आठ बंद बंगले फोडून चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या प्रोजेक्टमधील सर्व बंगले मालक बाहेरगावी राहत असल्याने ते बंद असतात. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी आठ बंगल्यांची कुलपे तोडली. यातील आई नावाच्या बंगल्यातून ३० हजार रुपये रोख आणि एक ग्रॅम सोन्याचे नाणे चोरीला गेल्याचा संशय आहे. हा बंगला मुंबई येथील ऋषिकेश सुभाष गिरकर यांच्या मालकीचा असून चोरट्यांनी येथील सीसीटीव्ही कॅमेरा फोडला आहे.इतर सात बंगल्यांमध्ये चोरट्यांनी सामानाची उचकापाचक केली असली तरी तेथून काहीही चोरीला गेले नसल्याचे समजते. हे बंगले तारी, कन्याळकर, दळवी, फाटक, मोरे, सावंत आणि पवार यांच्या मालकीचे आहेत.घटनेची माहिती मिळताच मालवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून काही बंगल्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित चोरटा कैद झाला आहे.दरम्यान, प्रोजेक्टमध्ये नवीन बंगल्यांचे बांधकाम सुरू असून तेथे राहणाऱ्या एका परप्रांतीय कामगाराच्या संशयास्पद हालचाली आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
konkansamwad 
