ॲड. समीर वंजारी यांची कोकण विभाग पतसंस्था फेडरेशनवर कायदेशीर तज्ज्ञ संचालक म्हणून एकमताने निवड
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे ॲड. समीर वंजारी यांची मानाचे स्थान असलेल्या कोकण विभाग पतसंस्था फेडरेशनवर कायदेशीर तज्ज्ञ संचालक म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनमध्ये त्यांनी केलेले उत्कृष्ट काम, सहकार क्षेत्रातील अनुभव आणि कायदेशीर विषयांवरील प्रभुत्व लक्षात घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली. या निवडीचे अधिकृत पत्र फेडरेशनचे अध्यक्ष गिरीश तुळपुले यांनी त्यांना प्रदान करून अभिनंदन केले.या निवडीबद्दल वैश्य समाज पतसंस्था, सिंधुदुर्ग यांच्यावतीने त्यांचा विशेष सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.ॲड. समीर वंजारी यांचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील प्रवास उल्लेखनीय आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी तालुका उपाध्यक्ष, लॉ कॉलेजचे जनरल सेक्रेटरी तसेच महाविद्यालयीन जीवनात क्लास रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या ते वैश्य समाज पतसंस्था, सिंधुदुर्ग तसेच सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत.शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. नुकत्याच पूर्ण केलेल्या एलएलएम (क्रिमिनॉलॉजी) परीक्षेत त्यांनी महाविद्यालयात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तसेच त्यांनी MBA, गांधी विचारधारा दर्शन व कला शाखेतील पदवी प्राप्त केली असून ह्यूमन राइट्स, जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयांमध्ये डिप्लोमा पूर्ण केला आहे.या निवडीपर्यंत पोहोचण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ, वैश्य समाज पतसंस्थेचे अध्यक्ष बाळा वळंजू, माजी अध्यक्ष सुनील कोरगावकर, दिलीप पारकर, बाळा पारकर यांचे मार्गदर्शन लाभले.ॲड. समीर वंजारी यांच्या या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
konkansamwad 
