बंगालच्या उपसागरात 'मुरासू' चक्रीवादळ तीव्र.... आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज ?
रत्नागिरी
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता 'मुरासू' चक्रीवादळात झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 1 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या बुलेटिननुसार, हे चक्रीवादळ सध्या दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात सक्रिय आहे. पुढील काही तासांत त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून, आज 2 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता मुरासू चक्रीवादळ चेन्नईपासून सुमारे 560 किलोमीटर, विशाखापट्टणमपासून 660 किलोमीटर आणि नेल्लोरपासून 630 किलोमीटर अंतरावर होते. त्यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी 65 ते 75 किलोमीटर होता, तर वाऱ्यांचे झोत ताशी 85 किलोमीटरपर्यंत पोहोचत होते. हे चक्रीवादळ पश्चिम-वायव्य दिशेने सरकत असून, 2 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते वायव्य दिशेने पुढे सरकेल. 2 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 3 नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत नेल्लोर आणि नरसापूरदरम्यान दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी 100 ते 110 किलोमीटर, तर झोतांचा वेग ताशी 120 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. मुरासू चक्रीवादळाचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होण्याचा अंदाज नसला, तरी या हवामान प्रणालीमुळे राज्यातील काही भागांत पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. काही भागांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
konkansamwad 
