मच्छिमारांसाठी खूशखबर!...मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी घरबसल्या करता येणार ऑनलाइन अर्ज

मच्छिमारांसाठी खूशखबर!...मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी  घरबसल्या करता येणार ऑनलाइन अर्ज

मालवण

   राज्यातील मच्छिमार, मत्स्यशेतकरी आणि मत्स्यव्यवसायिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' अंतर्गत तब्बल २४ लाभार्थीमुख योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज करण्याची सोय सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महाडीबीटी २.०' प्रणालीवर या नव्या सुविधेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. राज्यात मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व्हावी आणि लाभार्थ्यांना पारदर्शक व गतिमान सेवा मिळावी, यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या ऑनलाइन प्रणालीमुळे राज्यातील मच्छिमार, मत्स्यशेतकरी, व्यावसायिक तसेच मत्स्यमार संस्थांना आता घरबसल्या योजनांसाठी अर्ज करणे सुलभ होणार आहे. यासाठी कागदपत्रांची अनावश्यक जुळवाजुळव करण्याची गरज उरलेली नाही, कारण शासकीय डेटाबेसमधून आवश्यक माहिती सहज उपलब्ध होणार असून विविध प्रमाणपत्रेसुद्धा ऑनलाइन स्वरूपातच मिळतील. विशेष म्हणजे, या योजनांतर्गत मंजूर होणारे सर्व अनुदानाचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. यामुळे संपूर्ण अनुदान वितरण प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राहून लाभार्थ्यांचा मौल्यवान वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहेत. कमी कागदपत्रे, सुलभ अर्ज प्रक्रिया आणि जलद सेवेमुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ अधिक वेगाने घेता येणार असून, यामुळे राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला डिजिटल तंत्रज्ञानाची मोठी जोड मिळणार आहे.