सावंतवाडीत गोवा बनावटीच्या दारुसह एकाला अटक
सावंतवाडी
शहरात माऊली जनरल स्टोअर व मिलाग्रीस चर्चच्या बाजूला सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या टीव्हीएस ज्युपिटर वाहनांच्या डिकीतून बेकायदेशीरपणे गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी आणणाऱ्या एकास ताब्यात घेतले आहे. श्रीकांत चंद्रकांत आजगावकर (५७) रा. सालईवाडा, सावंतवाडी असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजगावकर हा दोन ज्युपिटर वाहनांच्या डिकीत गोवा बनावटीची विविध ब्रँडची दारू विनापरवाना बाळगून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करताना पोलिसांना रंगेहात मिळून आला. या कारवाईत पोलिसांनी दीड लाख रुपये किमतीची दोन वाहने आणि डिकीतून वेगवेगळ्या कंपन्यांच्या सिलबंद दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून ग्रे रंगाची टीव्हीएस ज्युपिटर (क्र. MH-07-AV-9515) आणि इतर रंगाची टीव्हीएस ज्युपिटर (क्र. MH-07-AW-1201) अशी प्रत्येकी ७५ हजार रुपये किमतीची दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हिंगे, पीएसआय अविनाश पाटील, हेड कॉन्स्टेबल शिंदे, राऊळ आणि पोलीस कॉन्स्टेबल भुजबळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंगाडे करत आहेत.
konkansamwad 
