तुळसमध्ये १०० महिलांचा ‘नारी सन्मान’....महिला लोकप्रतिनिधी, अंगणवाडी सेविकांचा गौरव
वेंगुर्ला
महिला लोकप्रतिनिधींसह अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या कार्याची दखल घेत वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग-तुळसतर्फे आयोजित ‘नारी सन्मान सोहळ्या’त पाच गावांतील १०० महिलांचा गौरव करण्यात आला. मठ, तुळस, होडावडे, पाल आणि मातोंड येथील महिलांना मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. तुळस येथील कर्मयोगी रामभाऊ तुळसकर स्मृती सभागृहात झालेल्या या सोहळ्याचे उद्घाटन पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सरपंच रश्मी परब, कावेरी गावडे, रुपाली नाईक, रसिका केळुसकर आणि डॉ. विवेक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना शंकर घारे म्हणाले, ग्रामीण भागाच्या विकासात महिला लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची आहे. महिलांना नेतृत्वासाठी प्रोत्साहन देतानाच त्यांच्या कार्याला कुटुंब आणि समाजाने सहकार्य करणे आवश्यक आहे. महिला नेतृत्व अधिक सक्षम झाल्यास ग्रामविकासाला बळ मिळेल. जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ म्हणाल्या, महिला लोकप्रतिनिधी, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ग्रामीण समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. गावपातळीवरील जबाबदाऱ्या पार पाडतानाच महिला सक्षमीकरण, बालसंगोपन, पोषण आणि पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी त्या कार्यरत असतात. त्यांच्या कार्याचा सन्मान करणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब आहे. प्रमुख अतिथी डॉ. विवेक चव्हाण यांनी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग-तुळसच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. कला, क्रीडा, शिक्षण, समाजसेवा आणि आरोग्य क्षेत्रात प्रतिष्ठान राबवत असलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी प्रशंसा केली. ‘आमच्या कार्याची अशा प्रकारे दखल घेऊन सन्मानित करण्यात आले, याचा विशेष आनंद आहे’, अशी भावना उपस्थित महिलांनी व्यक्त करत वेताळ प्रतिष्ठानप्रति कृतज्ञता व्यक्त केली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन वासुदेव परुळकर यांनी प्रास्ताविक केले, तर शैलजा परुळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महेश राऊळ, माधव तुळसकर, विवेक तिरोडकर, डॉ. गोविंद धुरी, रोहन राऊळ, नाना राऊळ, प्रसाद भणगे, सानिया वराडकर, वैष्णवी परूळकर, निकिता कबरे, भूमी परूळकर आणि भार्गवी परूळकर यांनी सहकार्य केले.
konkansamwad

