गोव्यातून महाराष्ट्रात जाणारा अवैध दारू साठा जप्त

गोव्यातून महाराष्ट्रात जाणारा अवैध दारू साठा जप्त

बांदा, ता. २८ ऑगस्ट 


      गोव्यातून महाराष्ट्राच्या दिशेने होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर पेडणे अबकारी खात्याने मोठी कारवाई करत सुमारे 400 बॉक्स मॅकडॉवेल दारूचा साठा जप्त केला आहे. पत्रादेवी येथील गोवा-महाराष्ट्र सीमा चेकनाक्यावर आज पहाटे 2 वाजेच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली. गोव्याकडून महाराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या एका संशयित ट्रकला अबकारी अधिकाऱ्यांनी चेकनाक्यावर अडवून तपासणी केली. ट्रकमध्ये पुढील बाजूस कांद्याच्या पिशव्या रचून त्यामागे दारूचा साठा लपवण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी ट्रकच्या मागील भागाची सखोल पाहणी केली असता कांद्याच्या पिशव्यांच्या आड दडवलेले दारूचे बॉक्स आढळून आले. दारूचा साठा आढळताच अधिकाऱ्यांनी ट्रक ताब्यात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. या दरम्यान संधी साधून ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. सध्या अबकारी पथकाकडून फरार चालकाचा शोध सुरू आहे. या कारवाईत मॅकडॉवेल ब्रँडच्या 180 एमएल क्षमतेच्या बाटल्यांचे सुमारे 400 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेली दारू आणि ट्रकची एकूण किंमत सखोल तपासानंतर स्पष्ट होणार आहे. गोवा-महाराष्ट्र सीमेवरील पत्रादेवी चेकनाक्यावर अवैध दारू वाहतुकीविरोधात अबकारी खाते सतर्क असून, यापूर्वीही येथे अनेक यशस्वी कारवाया करण्यात आल्याची माहिती अबकारी निरीक्षक सलील वळवयकर यांनी दिली. ही कारवाई निरीक्षक सलील वळवयकर, विक्रांत कोरगावकर, निलेश गावडे, उदय गवस, सुनील कोरबोटकर, शाहू पावणे, अनिल गावकर आणि विठोबा नाईक यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे गोव्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.