सावंतवाडी नळपाणी योजनेतील २८ कोटींच्या खर्चाचा हिशोब द्या....सावंतवाडी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांची मागणी

सावंतवाडी नळपाणी योजनेतील २८ कोटींच्या खर्चाचा हिशोब द्या....सावंतवाडी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांची मागणी

सावंतवाडी 


      शहरातील सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत सुरू असलेल्या ५७ कोटींच्या नळपाणी पुरवठा योजनेतील २८ कोटींच्या खर्चाबाबत आणि उर्वरित निधीच्या नियोजनाबाबत सीओईपी आणि पीएमसीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी उपनगराध्यक्ष  ॲड. अनिल निरवडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी नगरसेवक  ॲड. सिद्धार्थ भांबुरे उपस्थित होते.या योजनेंतर्गत आतापर्यंत ठेकेदाराला २८ कोटी रुपये अदा करण्यात आले असून त्याचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवणे आवश्यक असल्याचे निरवडेकर म्हणाले. विशेष सभेत थर्ड पार्टी ऑडिटचे सादरीकरण होणार होते, मात्र ऑडिटरच अनुपस्थित राहिल्याने शंका निर्माण झाल्या आहेत.ऑडिटरने स्वतः सभागृहात उपस्थित राहून स्पॉट व्हिजिट करत कामाची खातरजमा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पाईप टाकल्यानंतर कोटिंग आणि खडीकरण कराराप्रमाणे झाले आहे का, कोल्ड मिक्स किती ठिकाणी झाले याचा स्पष्ट उल्लेख अहवालात हवा, असेही त्यांनी नमूद केले.ही योजना थांबवण्याचा हेतू नसून केवळ पारदर्शकता हवी आहे. जोपर्यंत ऑडिटर येऊन शंकांचे निरसन करत नाहीत आणि खोदलेले रस्ते सुस्थितीत आणले जात नाहीत तोपर्यंत पुढील काम होऊ देणार नाही, असा इशारा निरवडेकर यांनी दिला.