५ एप्रिलला देवगडमध्ये सायकल रॅलीचे आयोजन ....खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य
देवगड
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून देवगडमध्ये एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.देवगड मंडल भाजप आणि इको व्हील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ५ एप्रिलला सकाळी ६ वाजता भव्य सायकल रॅली काढली जाणार आहे. या उपक्रमाची सविस्तर माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष राजा भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.ही सायकल रॅली प्रामुख्याने दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. यामध्ये १२ वर्षांखालील मुलांसाठी 'शालेय गट' आणि सर्वांसाठी 'खुला गट' अशा दोन श्रेणी असतील. शालेय गटातील मुलांसाठी ११ किलोमीटरचे अंतर निश्चित करण्यात आले असून, त्यांची रॅली जामसंडे येथील भाजप कार्यालयापासून सुरू होऊन कुणकेश्वर मार्गे पुन्हा कार्यालयाकडे परतणार आहे. तर खुल्या गटातील सायकलस्वारांना २५ किलोमीटरचा प्रवास करावा लागेल. हा गट जामसंडे भाजप कार्यालयापासून कातवण पेट्रोल पंपापर्यंत जाऊन पुन्हा मूळ स्थानी परत येईल.सुरक्षेच्या दृष्टीने आयोजकांनी या रॅलीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक सायकलस्वारासाठी हेल्मेट घालणे अनिवार्य केले आहे. आरोग्याप्रति जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या रॅलीत सहभागी होणाऱ्या सर्वांचे कौतुक केले जाणार आहे. रॅली यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आयोजकांतर्फे मोफत टी-शर्ट, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
konkansamwad 
