मुक्ताई ॲकेडमीचे बुद्धिबळात घवघवीत यश ; जिल्हास्तरीय स्पर्धेत 5 पारितोषिकांवर नाव कोरले
सावंतवाडी
वेंगुर्ला येथे झालेल्या कै. महेश परब स्मृती चषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत पाच पारितोषिके पटकावली आहेत.10 वर्षाखालील वयोगटात विघ्नेश अंबापूरकर याने द्वितीय क्रमांक, प्रज्वल नार्वेकर याने चौथा क्रमांक तर मोहिशा जाधव हिने पाचवा क्रमांक मिळवला. तर 13 वर्षाखालील वयोगटात यश सावंत याने तृतीय आणि अथर्व वेंगुर्लेकर याने पाचवा क्रमांक पटकावला. विजेत्यांना रोख पारितोषिक, चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेत सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड शाखेतील मुक्ताई ॲकेडमीच्या 27 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.विशेष म्हणजे स्पर्धेतील सर्वात लहान स्पर्धक ठरलेली सावंतवाडीची अवघ्या 6 वर्षांची दिव्यांका नार्वेकर आणि देवगडचा सर्वात लहान मुलगा आकाश वाटवे यांनी 6 राऊंडमध्ये साडेतीन गुण मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या दोघांसह इतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मेडल आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले.यावेळी प्रशिक्षक आणि राज्य पंच बाळकृष्ण पेडणेकर आणि मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष, ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर उपस्थित होते. सर्व स्तरातून विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
konkansamwad 
