रानबांबुळीत खवले आणि सांबराची शिंगे जप्त:९२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत....स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रानबांबुळी अनावकरवाडी येथे सापळा रचून तब्बल ९२ लाख रुपये किमतीची दुर्मिळ खवले मांजराची खवले, सांबराची दोन शिंगे आणि दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.गणेश प्रदीप शिर्के (वय ३०, रा. पडवे, ता. कुडाळ), विठोबा भगवान बावळेकर (वय ८२, रा. रानबांबुळी), शंकर यशवंत तारापूरे (वय ३१, रा. पाडवे) आणि कालिदास दत्तात्रय वारंग (वय ५५, रा. सुकलवड, ता. मालवण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने शुक्रवार, दिनांक २९ मे २०२६ रोजी सकाळी ११:४० वाजण्याच्या सुमारास रानबांबुळी अनावकरवाडी येथे ही कारवाई केली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून १.८०० किलो वजनाची दुर्मिळ खवले मांजराची खवले, वन्यप्राणी सांबराची २ शिंगे आणि तस्करीसाठी वापरलेल्या २ मोटारसायकली असा एकूण ९२,००,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.या प्रकरणी आरोपींविरुद्ध सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ४४, ४९ (ब), ५१ सह भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक अनिल हडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार डॉमिनिक डिसोजा, राणे, जॅक्सन, पोलीस कॉन्स्टेबल कांडर आणि समजिस्कर यांच्या पथकाने केली असून सिंधुदुर्गनगरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
konkansamwad 
