सिंधुदुर्गात १ एप्रिलपासून 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियान ....प्रमोद कामत यांची माहिती

सिंधुदुर्गात १ एप्रिलपासून 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियान ....प्रमोद कामत  यांची माहिती

 

सिंधुदुर्गनगरी

 

    प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणारी आरोग्य सेवा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ एप्रिल २०२६ पासून 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' हे महत्त्वाकांक्षी अभियान राबवले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व ४३१ ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पत्रकार परिषदेत केले.या अभियानांतर्गत केवळ आरोग्य तपासणीच नव्हे, तर स्वच्छता, शुद्ध पाणी, लसीकरण आणि कुपोषण मुक्तीवर भर दिला जाणार आहे. विशेषतः क्षयरोग, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या आजारांचे वेळेत निदान करून उपचार केले जातील. ग्रामपंचायत स्तरावर राबवल्या जाणाऱ्या या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर लाखो रुपयांची बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.अभियानात सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायतींना ३० एप्रिलपर्यंत ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. मे महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती या संपूर्ण मोहिमेवर नियंत्रण ठेवणार आहे. आपला जिल्हा राज्यात अग्रेसर राहावा, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.