परदेशी पर्यटकांच्या हालचालींवर आता प्रशासनाची करडी नजर राहणार
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्याला लागून असलेल्या गोवा सीमेवरून शिरोडा आणि वेळागर सारख्या पर्यटन स्थळांवर येणाऱ्या परदेशी पर्यटकांकडून अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन होण्याची शक्यता आहे. ही बाब गांभीर्याने घेत निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी या भागात विशेष सतर्कता बाळगून कडक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. गोव्याहून जलमार्गाने किंवा दुचाकीवरून येणाऱ्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून जिल्ह्यात अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व विभागांनी पोलीस प्रशासनाशी समन्वय ठेवावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या मासिक बैठकीत श्री. सुकटे बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर पावले उचलण्याचे निर्देश दिले. विशेषतः किनारपट्टीच्या भागात परदेशी नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे या भागातील सुरक्षेबाबत त्यांनी अधिक भर दिला आहे. केवळ कारवाई करून हे संकट थांबणार नाही, तर त्यासाठी गुप्त बातमीदारांचे जाळे भक्कम करून ठोस माहिती काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.अंमली पदार्थांचा विळखा शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत पोहोचू नये, यासाठी शैक्षणिक संस्थांच्या परिसरातही कडक पाळत ठेवण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. अंमली पदार्थ मुक्त सिंधुदुर्ग मोहिमेत केवळ पोलीसच नव्हे, तर सर्व शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग घेऊन जनजागृती मोहीम राबवणे गरजेचे आहे. जिल्ह्याच्या तरुण पिढीला या व्यसनापासून वाचवण्यासाठी समाजात मोठी जनजागृती करण्याचे आवाहन करत, दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर अजिबात दया न दाखवता कडक कारवाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहेत.
konkansamwad 
