महिला दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या रणरागिणींचा गौरव....सावंतवाडीच्या 'सामाजिक बांधिलकी'चा उपक्रम
सावंतवाडी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सावंतवाडीत सामाजिक क्षेत्रात आणि आरोग्य सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रणरागिणींचा सत्कार करण्यात आला, तर प्रतिष्ठानच्या वतीने रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.समाजामध्ये निराधार, दिव्यांग आणि गरजू रुग्णांसाठी अहोरात्र धावून जाणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सचिव समीरा खलील आणि रूपा मुद्राळे या दोन रणरागिणींच्या कार्याची दखल राजा शिवाजी चौक मित्र मंडळाने घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करणे, निराधारांना पेन्शन मिळवून देणे आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीचा हात पुढे करणे, अशा त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर, बंटी माठेकर, विजय पवार, बंड्या तोरस्कर, पुंडलिक दळवी, डुमिंग आल्मेडा, बावतीस फर्नांडिस, इप्तिकार राजगुरू, मनोज घाटकर, डायमंड शेख, लक्ष्मण कदम, रवी जाधव आणि इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

konkansamwad 
