महिला आरक्षण विधेयकावरून भाजप-काँग्रेस आमने-सामने....श्वेता कोरगावकरांचा साक्षी वंजारींवर निशाणा
सावंतवाडी
महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून सिंधुदुर्गच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी काँग्रेसच्या साक्षी वंजारी यांच्यावर जोरदार टीका करत अभ्यासपूर्ण वक्तव्य करण्याचा सल्ला दिला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कोरगावकर म्हणाल्या, "आज भारत देश क्षेत्रफळाने खूप मोठा आहे. खासदार आपल्या मोठ्या मतदारसंघात फिरून जनतेचे प्रश्न, अडचणी जाणून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे देशातील ५० टक्के असलेल्या माता-भगिनींना कायदेमंडळ म्हणजे लोकसभेत कायद्याने आरक्षण देऊन देशाच्या कामकाजात सहभागी करून घेतले तर देशाची निश्चित प्रगती होईल. ज्या कुटुंबात महिलांचे मत घेऊन काम केले जाते ते कुटुंब नेहमी प्रगती करते, तसेच देशाचेही आहे."
भाजपवर राजकारणाचा आरोप फेटाळत कोरगावकर यांनी काँग्रेसवरच महिलांचा हक्क डावलल्याचा आरोप केला. "भाजप व त्यांचे सहकारी पक्ष यांनी कुठे राजकारण केले? उलट महिलांना कायदेमंडळात संधी नाकारून विरोध करणाऱ्या पक्षांनी महिलांचा हक्क डावलला आहे. गेल्या अनेक दशकांपासून महिला आरक्षणाचे गाजर दाखवणाऱ्या काँग्रेसने पुन्हा एकदा संसदेत आपले खरे रूप उघड केले आहे. ३३ टक्के महिला आरक्षण विधेयकावर काँग्रेसने घेतलेली भूमिका ही केवळ महिलांच्या प्रगतीत अडथळा निर्माण करणारी नसून, जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याचे एक जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, काँग्रेस सध्या एक 'राजकीय डबल गेम' खेळत आहे," असा घणाघात त्यांनी केला.
२०२३ च्या विधेयकातील त्रुटींवर भाष्य करताना कोरगावकर म्हणाल्या, "२०२३ ला जे बिल पास झालं होतं, त्यात महत्त्वाची अट होती की, आरक्षण तेव्हाच लागू होईल जेव्हा देशात नवीन जनगणना होईल आणि मतदारसंघांची पुनर्रचना होईल. याचा अर्थ महिलांना प्रत्यक्ष आरक्षण मिळायला २०३४ साल उजाडलं असतं. म्हणजे कागदावर आरक्षण होतं, पण प्रत्यक्षात मिळायला १०-१२ वर्ष वाट पाहावी लागली असती."
"पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांना दिलेलं त्यांच्या हक्काचं आरक्षण कायदा झाल्यानंतर लगेच मिळालं पाहिजे ही भूमिका मांडली. ही भूमिका समस्त महिला वर्गाच्या हिताची होती. पण, काँग्रेसने हे होऊ दिले नाही," असेही त्यांनी नमूद केले.
साक्षी वंजारी यांना लक्ष्य करत कोरगावकर म्हणाल्या, "वंजारींनी डिलिमिटेशन समजून घेतले काय? मोदीजी हे बिल फक्त डिलिमिटेशनसाठी वापरत आहेत. मुळातच साक्षी वंजारी यांना याविषयावर अभ्यास करण्याची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुजाण महिला मतदानातून यांचे उत्तर देतीलच."
konkansamwad 
