पिंगुळीतील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात १५ ऑगस्टला ज्येष्ठ नागरिकांचे खड्ड्यात बसून आंदोलन
सिंधुदुर्ग
पिंगुळी गावातील हायवे ते माघी गणेश कॉलनीपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था आणि ग्रामपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात 15 ऑगस्ट 2026 रोजी ज्येष्ठ नागरिक खड्ड्यात बसून आंदोलन करणार आहेत.आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या नोटीसेनुसार 2024 सालीही याच मागणीसाठी आंदोलनाची नोटीस दिली होती. त्यावेळी तत्कालीन गटविकास अधिकारी कुडाळ यांनी चर्चा घडवून पिंगुळी ग्रामपंचायतीला रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवणे, हायवे ते माघी गणेश कॉलनीपर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण पावसाळ्यानंतर करणे आणि माधी गणेश कॉलनी ते संकल्प नगरपर्यंतचा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून गटारासहित करण्याचा प्रस्ताव तात्काळ पाठवणे, अशा सूचना दिल्या होत्या. त्या चर्चेनंतर 15 ऑगस्ट 2024 चे आंदोलन स्थगित करण्यात आले होते.मात्र ग्रामपंचायतीने केवळ खड्डे बुजवून बोर्ड लावून दिशाभूल केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. ग्रामपंचायतीने रस्त्यासाठी 10 लाख रुपये मंजूर असल्याचे लेखी सांगितले असले तरी प्रत्यक्षात फक्त 4036 रुपये खर्च करून गावडे यांच्या घरापर्यंत डांबरीकरण केले. तेही तकलादू असल्याने चालू पावसाळ्यात तेथे पुन्हा मोठे खड्डे पडले आहेत. माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीवर ग्रामपंचायत अधिकारी निवतकर यांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.माधी गणेश कॉलनी ते संकल्प नगर या वाडीजोड रस्त्याचा पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा प्रस्ताव मार्च 2025 पर्यंत पाठवला नसल्याने तो या वर्षीही मंजूर होऊ शकला नाही. कॉलनीतील गटार, संरक्षण भिंत आणि इतर 6 कामेही अर्धवट असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.2000 पासून एकाही वर्षी खड्डेविरहित रस्ता मिळाला नाही. त्यामुळे 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही दोघे आणि कॉलनीतील काही सहकारी 73 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक पावसात उघड्या अंगाने खड्ड्यात बसून निषेध नोंदवू, असे आंदोलकांनी सांगितले. या आंदोलनात काही अनिष्ट घडल्यास त्याची जबाबदारी ग्रामपंचायत पिंगुळीवर राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
konkansamwad 
