कणकवली, देवगड आणि वैभववाडीत २५ कोटींचे रस्ते काम मंजूर 

कणकवली, देवगड आणि वैभववाडीत २५ कोटींचे रस्ते काम मंजूर 


 

कणकवली

 

   सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी रस्ते विकासासाठी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. त्यांच्या एका पत्राची दखल घेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अर्थसंकल्पीय निधीतून कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील महत्त्वाच्या रस्ते विकास कामांना मंजुरी दिली आहे. या तिन्ही तालुक्यांसाठी एकूण २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सोपे होणार आहे.मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये प्रामुख्याने राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांचा समावेश आहे. यामध्ये कणकवली तालुक्यातील कणकवली-शिवाजीनगर ते फोंडा रस्ता सुधारणेसाठी २ कोटी ५० लाख, तर वैभववाडी तालुक्यातील खारेपाटण ते तिवरे आणि फोंडा ते उंबरे या मार्गांच्या डांबरीकरणासाठी प्रत्येकी २ कोटी ५० लाख रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय शिवल-शिवडाव मार्गावर नवीन पुलाच्या बांधकामासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देवगड तालुक्यातील रस्ते विकासावरही विशेष भर देण्यात आला आहे. तांबाळे-केंकवण, सिरीये, आरे-पाटणसाळ, सांडवे, नांदगाव-राहाटी आणि लिंगडाळ या भागातील प्रमुख जिल्हा मार्गांच्या सुधारणेसाठी कोट्यवधींचा निधी मिळाला आहे. पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष पत्र देऊन या कामांची गरज बांधकाम मंत्र्यांकडे मांडली होती. या निधीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचा आणि डांबरीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.