वझरे येथे ओव्हरलोड ट्रकखाली बैल चिरडला.....ग्रामस्थ आक्रमक....रात्रीची अवैध वाहतूक बंद करण्याची मागणी

वझरे येथे ओव्हरलोड ट्रकखाली बैल चिरडला.....ग्रामस्थ आक्रमक....रात्रीची अवैध वाहतूक बंद करण्याची मागणी

दोडामार्ग

 

     दोडामार्ग तालुक्यातील वझरे येथील वेदांत कोक कंपनीकडे गोवा राज्यातून रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या कथित अवैध आणि ओव्हरलोड कोळसा वाहतुकीमुळे आणखी एका प्राण्याचा बळी गेला आहे. मंगळवारी रात्री कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भरधाव ट्रकने एका शेतकऱ्याच्या बैलाला चिरडल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याच्या दिशेने कंपनीकडे कोळसा घेऊन येणारा केए-37-बी-4083 या कर्नाटक पासिंगच्या ट्रकने गेटसमोर उभ्या असलेल्या गुरांच्या कळपाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की एका शेतकऱ्याचा बैल ट्रकखाली काही अंतर फरफटत गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर जमलेल्या ग्रामस्थांनी ट्रकचालकासह निष्काळजी यंत्रणेविरोधात रोष व्यक्त केला.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वेदांत कोक कंपनीसाठी दररोज रात्री मोठ्या प्रमाणात डंपर आणि 12 चाकी अवजड ट्रक्सद्वारे कोळशाची वाहतूक होते. ही वाहने क्षमतेपेक्षा जास्त माल भरून भरधाव वेगाने धावतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिक आणि पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रात्रभर होणाऱ्या या वाहतुकीमुळे ग्रामस्थांच्या झोपेचेही नुकसान होत आहे. या घटनेनंतर रात्रीच्या अंधारात चालणाऱ्या या कथित अवैध वाहतुकीला प्रशासनाचा पाठिंबा आहे का, असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. वझरे व परिसरातील ग्रामस्थांनी या कोळसा वाहतुकीची उच्चस्तरीय चौकशी करावी, सर्व ओव्हरलोड व परप्रांतीय वाहनांच्या परवानग्यांची तपासणी करून दंडात्मक कारवाई करावी आणि रात्रीची बेकायदेशीर वाहतूक त्वरित बंद करावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.